पुणे, 04 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ मज्जासंस्था विकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 163 वर पोहोचली आहे. तसेच या आजाराचे सोमवारी (दि.03) पुण्यात आणखी 5 नवे रुग्ण आढळले, मात्र कोणताही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
https://x.com/PTI_News/status/1886607767768907894?t=uklH6h5cUTEujnHoP-hAeQ&s=19
जीबीएसचे रुग्ण किती?
दरम्यान, महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजारामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 127 रुग्णांना अधिकृतपणे जीबीएस असल्याची पुष्टी झाली आहे. तसेच राज्यातील जीबीएसच्या संशयित 163 प्रकरणांमध्ये पुणे शहरातील 32 रुग्ण, पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट गावांतील 86 रुग्ण, पिंपरी-चिंचवडमधील 18 रुग्ण, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 19 रुग्ण आणि इतर जिल्ह्यांतील 8 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जीबीएस म्हणजे काय?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा मज्जासंस्थेशी संबंधित आजार असून, तो शरीराच्या मज्जातंतूंवर हल्ला करतो. त्यामुळे हात-पाय बधीर होणे, स्नायू कमजोर होणे, चालण्यात अडचण येणे, जुलाब होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. काही रुग्ण गंभीर अवस्थेत जातात, मात्र योग्य वेळी उपचार घेतल्यास बरे होऊ शकतात.
जीबीएस कशामुळे होतो?
जीबीएस नेमका कशामुळे होतो? हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, पण हा आजार बॅक्टेरियल संसर्ग किंवा दूषित पाणी या कारणांमुळे होऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असून, संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा आजार अत्यंत दुर्मिळ असून प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते. लवकर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास बहुतांश रुग्ण पूर्णपणे बरे होतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. स्वच्छता राखणे, शरीरात अचानक अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि अफवांवर विश्वास न ठेवता योग्य माहिती घेणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.