राज्यात जीबीएसचे 149 संशयित रुग्ण, आरोग्य विभागाची माहिती

महाराष्ट्रात जीबीएस चे 225 संशयित रुग्ण

पुणे, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण संख्या सध्या वाढताना दिसत आहे. शनिवारी (दि.01) राज्यभरात जीबीएसच्या संशयित रुग्णांची संख्या 149 वर पोहोचली असून, त्यापैकी 124 रुग्ण हे जीबीएसचे असल्याचे निश्चित झाले आहेत. यामध्ये बहुतांश रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. आतापर्यंत जीबीएसच्या 5 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सध्या 28 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण

जीबीएसच्या 149 संशयित रुग्णांमध्ये पुणे महापालिका क्षेत्रात 29 रुग्ण, पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये 82 रुग्ण, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 17 रुग्ण, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 13 रुग्ण आणि इतर जिल्ह्यांमध्ये जीबीएसचे 8 संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

जीबीएस म्हणजे काय?

गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक ऑटोईम्यून आजार आहे. हा आजार शरीराची रोगप्रतिकार क्षमता आणि आपल्या मज्जासंस्थेवर हल्ला करतो. या आजारामुळे स्नायू कमकुवत होतात, आणि गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांमध्ये पॅरालिसिस होऊ शकते. त्यामुळे रुग्णांच्या त्वरित उपचाराची आवश्यकता आहे.

तज्ज्ञांची टीम पुण्यात दाखल

दरम्यान, गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) च्या प्रकरणांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक उच्चस्तरीय तज्ञांचे पथक पुण्यात पाठवले आहे. या सात सदस्यीय पथकात दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, बेंगळुरूतील एनआयएमएचएएनएस आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) चे तज्ज्ञ समाविष्ट आहेत. हे तज्ञांचे पथक राज्य आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रकरणांचा अभ्यास करत असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवत आहे.

पाणी नमुने तपासणीसाठी पाठवले

तसेच पुण्यातील विविध भागांतील पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठवले गेले आहेत. जीबीएसचे रुग्ण आढळल्यास तातडीने स्थानिक आरोग्य यंत्रणेला कळवावे, असे निर्देश आरोग्य विभागाने खासगी डॉक्टरांना दिले आहेत. तसेच राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने सांगितले की, या आजाराची परिस्थिती नियंत्रणात आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *