मुंबई, 03 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (दि.03) मुंबईत सुरू होत असून, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषनाने होईल. या अधिवेशनादरम्यान शनिवार दि. 8 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी असूनही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे. तसेच 13 मार्च रोजी होळीच्या निमित्ताने अधिवेशनाला सुटी देण्यात येणार आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1896434593978564897?t=FKMQA3-hCt-R4FVpjlCmuQ&s=19
हे मुद्दे गाजण्याची शक्यता
या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, महिलांवरील वाढते अत्याचार, स्वारगेट बस बलात्कार प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ 2100 रुपये करण्याचा विषय विरोधक उचलून धरू शकतात. या सर्व मुद्द्यांवर राज्य सरकार कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे असेल.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पारंपरिक चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. या चहापान कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री आणि आमदार उपस्थित होते. या चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवरील सरकारची भूमिका स्पष्ट केली.
राज्य सरकारची पत्रकार परिषद
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 5 विधेयकांवर चर्चा होईल. विधिमंडळात सर्व विषयांवर सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करत आहे. सरकारकडून विकास कामांबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना चांगले दिवस आणण्यासाठी व राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच राज्य सरकारची प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.