मुंबई, 10 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज (दि.10) महाराष्ट्राचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून, अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा एकूण 11 वा अर्थसंकल्प असेल. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांचे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष आहे.
अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार?
या अर्थसंकल्पाकडून तरूणवर्ग, शेतकरी, उद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्य जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. विशेषतः महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी कर्जमाफीसारख्या मुद्द्यांवर सरकार कोणते निर्णय घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यासोबतच, शेतकरी कर्जमाफी, नव्या उद्योग धोरणावर भर, रोजगाराच्या संधी वाढवण्याचे उपाय, आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठीच्या तरतूदी यासंबंधी अर्थसंकल्पात कोणती घोषणा केली जाते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लाडक्या बहिणींना खास भेट?
तत्पूर्वी, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राज्याच्या आर्थिक स्थितीवर या योजनेचा मोठा भार पडत असल्याचे विरोधकांकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात हा हप्ता वाढवणार का? याची उत्सुकता आहे.
अजित पवारांचा विक्रम
दरम्यान, अजित पवार यांनी आतापर्यंत 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. याबाबतीत जयंत पाटील यांनी 10 वेळा आणि सुशीलकुमार शिंदे 9 वेळा राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक वाटचालीसाठी हा अर्थसंकल्प कोणत्या दिशा देतो, हे आज स्पष्ट होणार आहे.