परभणी, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ परभणी शहरात बंद पुकारण्यात आला होता. परंतू, या बंदला हिंसक वळण लागले. त्यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी शहरातील अनेक भागांत दगडफेक आणि जाळपोळ केली. त्यानंतर पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी 50 आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यातील एका आंदोलकाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. सोमनाथ सुर्यवंशी असे कोठडीत निधन झालेल्या आंदोलकाचे नाव आहे.
रिपब्लिकन सेनेच्या वतीने बंदची हाक
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आंबेडकरी संघटनांच्या नेत्यांनी केली आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज (दि.16) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करून आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी. शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, यांसारख्या मागण्या रिपब्लिकन सेनेने केल्या आहेत.
https://x.com/RamdasAthawale/status/1868359012967694699?t=9asZgDSUp4DkWyH7Fww72Q&s=19
रामदास आठवलेंनी केली चौकशीची मागणी
दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. आंदोलनात सहभाग नसलेल्ला विद्यार्थी भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांना तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1868204387245429006?t=b82dY-1zzpN4VwW3TVwISg&s=19
पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण करावे, प्रकाश आंबेडकर यांची मागणी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे, हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला हे वेदनादायक आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने, आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी. याचे चित्रीकरण करण्यात यावे. फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली पोस्टमॉर्टम केले जावे. आम्ही न्यायासाठी लढत राहू, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात आज बंद
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात आज बंद पुकारण्यात आला आहे. अनेक शहरांत या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध ठिकाणी आज कडकडीत बंद पाडण्यात येत आहे. यासोबतच सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज अनेक शहरांमध्ये विविध आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.