मुंबई, 31 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पुढील येत्या 100 दिवसांत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
https://x.com/CMOMaharashtra/status/1873932882965897554?t=rWkkuRlLjCvHsDnfuKWl-g&s=19
1. परिवहन विभाग
यावेळी मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यात जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग आणि नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू करणे, रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर, घाट रस्त्यांसाठी विशेष अभियांत्रिकी उपाययोजना करणे आणि परिवहन सेवेला गती देण्यासाठी बाईक टॅक्सी तसेच मॅक्सी कॅब सेवा सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.
2. सांस्कृतिक कार्य विभाग
सांस्कृतिक कार्य विभागाच्या बाबतीत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी चित्रीकरणासाठी ऑनलाईन ‘एक खिडकी’ परवानगी प्रणाली सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच, पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘हर घर संविधान’ मोहिमेद्वारे प्रत्येक घरात संविधान पोहोचविण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिल्या आहेत.
3. ग्रामविकास व पंचायतराज विभाग
या बैठकीत राज्यातील 13 लाख घरकुलांसाठी 450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता लवकरच वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामीण रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटकरण करण्यासाठी विशेष योजना राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महाआवास अभियानाअंतर्गत प्रत्येक घर सौर ऊर्जेवर चालविण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामविकास व पंचायतराज विभागाला दिल्या आहेत.
4. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थलांतरित मजुरांसाठी स्मार्ट रेशनकार्ड सुरू करण्यास सांगितले आहे. यासोबतच, ई-केवायसी प्रमाणीकरण कारणे. तसेच ‘एक गाव एक गोदाम’ आणि ‘एक देश, एक शिधापत्रिका’ या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला निर्देश दिले आहेत.
5. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सोबतच हातमाग विणकरांना निवृत्ती वेतन योजनेद्वारे सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाला दिल्या आहेत.