जालना, 17 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) ओबीसी समाजाच्या वतीने आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेला ओबीसी समाजाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळ यांनी सरसकट मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. यासोबतच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याला देखील त्यांनी विरोध दर्शवला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले तर सर्वांचेच नुकसान होईल, असे छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. आजच्या सभेला छगन भुजबळ यांच्यासह पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर यांसारखे ओबीसी समाजाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
राज्यात झिका व्हायरसचे 5 रुग्ण
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. तसेच मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत. राज्य सरकारने 7 सप्टेंबर 2023 रोजी कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर काढला होता. तर हा जीआर रद्द करण्यात यावा. याशिवाय महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. यांसारख्या विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीने अंबड येथे महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
धनगर समाजाच्या वतीने आज बारामती बंदची हाक
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात, छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार या नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे हे ओबीसी नेते आजच्या या महासभेत काय बोलणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे. तर ओबीसी समाजाची आजची महासभा जालना जिल्ह्यातील अंबड येथे होणार आहे. अंबड हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी गावाच्या जवळचं आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
One Comment on “जालना जिल्ह्यात आज ओबीसींची महाएल्गार सभा”