बारामती, 05 मे: (विश्वजीत खाटमोडे) बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज (दि.05) इंदापूर आणि बारामती येथे जाहीर सभा पार पडल्या. त्यांच्या या सभेला सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख, सुनील केदार, शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, प्रा. नितेश कराळे, पवार कुटुंबीय यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1787168772878434570?s=19
दरम्यान, बारामती मतदारसंघात येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात प्रचारासाठी आज शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर, सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर आणि बारामती या दोन ठिकाणी जाहीर सभा पार पडल्या. यामध्ये बारामतीच्या सभेतून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता झाली. या सभेतून विविध मुद्द्यांवर भाष्य केले. गेली अनेक वर्षे आपण शेवटची सभा ही मिशन स्कूलच्या प्रांगणामध्ये घेतो. यंदा ते करणं शक्य झालं नाही. त्याचे कारण राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ती जागा आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी कुठलीही जागा ताब्यात घेतली, तरी चिंता करण्याचे कारण नाही. कोणी आपली जागा अडवली, तरी आपलं काही नुकसान होऊ शकत नाही, हे बारामतीकरांनी आज सिद्ध केलं असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.
“प्रश्न खूप आहेत. महागाईचे प्रश्न आहेत, बेकारीचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते यापैकी कुठल्याही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ही सत्ता वापरत नाही. म्हणून आपल्याला हा निकाल घ्यायचा आहे की या निवडणुकीमध्ये असे निकाल आपण घेऊ, की जेणेकरून या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि देशाला एक नवीन दिशा देण्याचं काम आपल्या सर्वांकडून केलं जाईल. त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, की या निवडणुकीमध्ये तुमचा निर्णय हा बारामतीचाच नाही, तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.