मनोरमा खेडकर यांच्या घरातून आलिशान कार आणि पिस्तूल जप्त

पुणे, 20 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील राहत्या घराची पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी झडती घेतली. यावेळी पोलिसांनी त्यांच्या घरातून एक आलिशान कार, परवाना असलेले पिस्तूल आणि 3 गोळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करीत आहेत. तत्पूर्वी, पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून स्थानिक शेतकऱ्यांना धमकी दिली होती. याप्रकरणात पोलिसांनी त्यांना काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. त्यांना कोर्टाने 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

https://x.com/ANI/status/1813889897436164175?s=19

https://x.com/ANI/status/1814542078158004732?s=19

https://x.com/ANI/status/1814314458346385683?s=19

घरातून कार आणि पिस्तूल जप्त

याप्रकरणी मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओही समोर आला होता. या व्हिडिओत मनोरमा खेडकर या बंदूक हातात घेऊन शेतकऱ्यांना धमकावताना दिसत होत्या. या प्रकरणी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका लॉजमधून मनोरमा खेडकर यांना अटक केली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील राहत्या घरावर छापा टाकून त्यांच्या घरातून एक आलिशान कार, परवाना असलेले पिस्तूल आणि 3 गोळ्या जप्त केल्या आहेत.

https://x.com/ANI/status/1814244889040765348?s=19

पूजा खेडकर विरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात देखील गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी, दिलीप खेडकर यांना पुणे सत्र न्यायालयाने 25 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तत्पूर्वी, प्रशिक्षणार्थी आयएएस असलेल्या पूजा खेडकर यांच्या अडचणी सध्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. यूपीएससी परीक्षेत बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अपंगत्व कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पूजा खेडकर यांनी परीक्षा नियमांतर्गत दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रयत्न करून फसवणूक केली. यामध्ये तिने आपले नाव, वडिलांची आणि आईची नावे, त्याचे फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून स्वतःची ओळख लपवली असल्याचे यूपीएससीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच यूपीएससीच्या तक्रारीवरून पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *