लॉस एंजेलिस, 10 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिस शहराच्या जंगली भागात गुरूवारी (दि.09) लागलेल्या आगीने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10,000 हून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. लॉस एंजेलिसच्या पॅसिफिक कोस्टपासून पासाडिनापर्यंत ही आग लागली. जंगलातील आगीने 5,000 एकराहून अधिक क्षेत्राचा विनाश केला आहे. या आगीमुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. या परिसरात अनेक चित्रपट, टीव्ही आणि संगीत क्षेत्रातील सेलिब्रिटींचे घरे आहेत. या आगीमुळे सेलिब्रिटींचे घरे असलेल्या या भागातील शांतता उध्वस्त झाली आहे.
https://x.com/PTI_News/status/1877588549974819255?t=WcuEyY5WowsJbRnM7Ez3lw&s=19
https://x.com/ANI/status/1877089346140123454?t=XDqyDWgNA7q_lYfkG4se3g&s=19
अनेक लोक बेघर
प्रशासनाने तातडीने हालचाल करत या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या आगीमुळे बहुतांश लोकांना घरे आणि त्यातील किंमती सामान सोडून पलायन करावे लागले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे तातडीच्या आणि गोंधळलेल्या स्वरूपातील स्थलांतराची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांनी आपले घर, मालमत्ता आणि पशुधन गमावले आहे. गुरूवारी भीषण वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरल्याने नागरिकांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. सुदैवाने गुरूवारी सायंकाळपर्यंत वाऱ्याचा वेग काहीसा कमी झाला. परंतु हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत (दि.10) ही आग लागण्याचा धोका कायम असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
दरम्यान, लॉस एंजेलिसच्या जंगली भागांमध्ये लागलेल्या आगींनी संपूर्ण क्षेत्राला झळ पोहोचवली आहे. पॅसिफिक पॅलिसेड्स आणि अल्टाडीना या प्रमुख भागांमध्ये लागलेल्या आगी गुरूवारी सायंकाळपर्यंत भडकलेल्या स्थितीत होत्या. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रचंड मेहनत घेत असूनही या आगींवर नियंत्रण मिळवणे कठीण ठरले आहे. अग्निशमन दल या भयंकर आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. ही परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दल रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. वाऱ्याचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे बचावकार्याला मदत झाली आहे.