अयोध्या, 22 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. भगवान श्रीराम आता अयोध्येत विराजमान आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची दुपारी 12.29 या मुहूर्तावर विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठीक दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी राम मंदिरात दाखल झाले. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव परिधान केला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांदीचे छत्र घेऊन राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला.
https://twitter.com/ANI/status/1749330157578695064?s=19
प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान!
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचा अभिषेक आणि विधीवत पूजा पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या शेजारी सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बसले होते. या पूजेनंतर पंतप्रधानांनी भगवान श्रीरामाच्या मूर्तीला वंदन करून चरणी पुष्प अर्पण केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भगवान श्री रामाची महाआरती झाली. त्यानंतर हा सोहळा संपन्न झाला. यावेळी रामलल्लाचा अभिषेक सोहळा पुर्ण झाल्यानंतर अयोध्या शहरात सर्वत्र हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. अयोध्येत भगवान श्री रामाची मूर्ती विराजमान झाल्यामुळे आता राम भक्तांची जवळपास 500 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आज संपली आहे.
अनेक व्हीव्हीआयपी सोहळ्याचे साक्षीदार
या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी 7 हजारांहून अधिक व्हीव्हीआयपी अयोध्येत पोहोचले होते. यामध्ये अनेक साधूसंत, राजकारणी, विविध उद्योगपती यांसह बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कॅटरीना कैफ, आयुष्मान खुराना, गायक शंकर महादेवन, सोनू निगम यांसारखे कलाकार या सोहळ्यासाठी अयोध्येत आले होते. या पार्श्वभूमीवर, अयोध्येत जोरदार तयारी करण्यात आली होती. तसेच संपुर्ण अयोध्या शहरात सध्या सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे.