लोणावळा, 3 नोव्हेंबर: लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असून नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. त्या पदासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छा व्यक्त करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे मी सर्व इच्छुकांचे मनापासून स्वागत करतो, असे मत आरपीआय (आठवले) चे प्रदेश सचिव, माजी नगराध्यक्ष लोनपा, माजी सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती आणि माजी सभापती शिक्षण मंडळ लोनपा सुर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केले.

इच्छुकांची संख्या अधिक असल्याने संपूर्ण शहरात भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. 15-20 उमेदवार शहरातील नागरिकांना सतत भेटत असल्याने नागरिकदेखील त्रस्त झाले आहेत. मी स्वतः नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार असल्याचे सुर्यकांत वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. परंतु अद्याप राजकीय चित्र स्पष्ट नसल्याने नागरिकांना त्रास नको म्हणून मी अजून शहरात भेटीगाठी सुरू केलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.

उमेदवारी महायुती, महाविकास आघाडी किंवा स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय झाला की मी लोणावळेकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी निश्चितच येणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत म्हणण्यापेक्षा मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. माझ्या सार्वजनिक राजकीय जीवनात लोणावळेकरांनी मला मोठी साथ दिली आहे. अशीच साथ भविष्यातही लाभावी, ही माझी मनापासून प्रार्थना आहे. मी कालही लोणावळेकरांसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही सोबत राहील, हा माझा शब्द आणि वचन आहे!

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच शहरात बॅनर लावून शहर विद्रूप होऊ नये याची मी दक्षता घेतली आहे. त्यामुळेच मी अद्याप इच्छुक उमेदवार म्हणून कुठलेही बॅनर लावलेले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

