मुंबई, 30 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने दक्षिण मुंबई मतदारसंघात यामिनी यशवंत जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात लढत होणार आहे. या जागेवर यामिनी जाधव यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे. दरम्यान, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे.
https://twitter.com/Shivsenaofc/status/1785272582876598369?s=19
यामिनी जाधव कोण आहेत?
यामिनी जाधव या सध्या भायखळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. यामिनी जाधव या मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. यामिनी जाधव यांना आता शिवसेना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा शिवसेना पक्षाकडून आज करण्यात आली आहे. तत्पूर्वी, दक्षिण मुंबईच्या जागेवर उमेदवार देण्यासाठी भाजप इच्छुक होते. त्यामुळे या जागेवर उमेदवार ठरण्यासाठी वेळ लागत होता. तसेच या जागेवर महायुतीकडून कोणाला संधी मिळणार? यासंदर्भातील चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र अखेर जागावाटपात ही जागा शिवसेना पक्षाकडे सुटल्याने दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेनेकडून यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
अरविंद सावंत यांचे मोठे आव्हान
या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यात लढत होणार आहे. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई येथील विद्यमान खासदार आहेत. सावंत यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्यामुळे या निवडणुकीत यामिनी जाधव यांच्यापुढे अरविंद सावंत यांचे मोठे आव्हान असणार आहे.