नवी दिल्ली, 15 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक उद्या जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाची उद्या, 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. हे वेळापत्रक निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याची माहिती निवडणूक आयोगाने आज दिली आहे. त्यामुळे उद्याच लोकसभेच्या तारखा जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Press Conference by the Election Commission to announce the schedule for General Elections 2024 & some State Assemblies will be held at 3 pm tomorrow, 16th March. It will be live streamed on the social media platforms of the ECI: ECI pic.twitter.com/JVGGQfMYgw
— ANI (@ANI) March 15, 2024
उद्याच आचारसंहिता लागू होणार?
यासोबतच देशभरात आचारसंहिता देखील लागू होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, देशातील काही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू या दोन निवडणूक आयुक्तांची कालच नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहेत.
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
या निवडणूक अधिकाऱ्यांची आज ह्या निवडणुकांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, यंदा लोकसभेच्या निवडणुका 6 ते 7 टप्प्यात घेतल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवडणूका जाहीर झाल्यानंतर संपूर्ण देशात आचार संहिता लागू होणार आहेत. तत्पूर्वी, 2019 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा 10 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी देशात 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. तर या निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी झाली होती. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक कधी आणि किती टप्प्यांत होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.