मुंबई, 19 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात उद्या (दि.20) मतदान होणार आहे. यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य अशा एकूण 13 जागांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 जागांवर देखील उद्याच मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता पूर्ण झाला आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://twitter.com/CEO_Maharashtra/status/1791456540622217598?s=19
महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक ही पाच टप्प्यात पार पडणार आहे. त्यातील चार टप्प्यातील निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. तर पाचव्या टप्प्यात उद्या राज्यातील 13 मतदारसंघात मतदान होणार आहे. ह्या निवडणुकीचा प्रचार काल सायंकाळी पूर्ण झाला आहे. या सर्व टप्प्यातील निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या जागांवर अशी लढत
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात सामना रंगणार आहे. दिंडोरी येथे भाजपच्या भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यात लढत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज अशी तिरंगी लढत होणार आहे. पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भारती कामडी आणि बहूजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भिवंडीमध्ये भाजपचे कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यात तिरंगी लढत आहे. कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात सामना आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांच्यात लढत होणार आहे.
मुंबईत सहा जागांसाठी मतदान
याशिवाय मुंबईतील 6 जागांवरही मतदान पार पडणार आहे. यामध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव अशी थेट लढत आहे. उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपचे उज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात सामना रंगणार आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात थेट लढत आहे. उत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजपचे मिहीर कोटेचा विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील यांच्यात सामना होणार आहे आणि वायव्य मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे रवींद्र वायकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल किर्तीकर यांच्यात लढत होणार आहे.