दिल्ली, 25 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशातील 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. यामध्ये राजधानी दिल्लीतील 7, उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील सर्व 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, ओडिशातील 6, झारखंडमधील 4 आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून, ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1794207676995609050?s=19
निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सुमारे 11.13 कोटींहून अधिक मतदार आहेत. यामध्ये 5.84 कोटी पुरूष, 5.29 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. सहाव्या टप्प्यासाठी 85 वर्षांवरील 8.93 लाखांहून अधिक नोंदणीकृत मतदार, 100 वर्षांवरील 23 हजार 659 मतदार आणि 9.58 लाख अपंग मतदार आहेत. ज्यांना घरबसल्या मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. देशातील वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, शेड, स्वच्छतागृहे, रॅम्प, व्हीलचेअर यांसारख्या सुविधा निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
सहाव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये मनेका गांधी, मनोहर लाल खट्टर, मेहबूबा मुफ्ती, राज बब्बर, दिनेश लाल निरहुआ, धर्मेंद्र यादव, मनोज तिवारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. दरम्यान, राज्यात यंदाची लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होणार आहे. यातील 6 टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज सायंकाळी पूर्ण होणार आहे. तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे.