पुणे, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान झाले. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान पार पडले. या मतदानाची सायंकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सरासरी 60.60 टक्के एवढे सर्वात जास्त मतदान झाले आहे. तर शिरूर मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 40.89 टक्के इतके सर्वात कमी मतदान झाले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने या मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केली नाही. त्यामुळे अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1789999855902810310?s=19
सरासरी मतदानाची टक्केवारी
चौथ्या टप्प्यात राज्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.60 टक्के, जळगाव – 51.98 टक्के, रावेर – 55.36 टक्के, जालना – 58.85 टक्के, औरंगाबाद – 54.02 टक्के, मावळ – 46.03 टक्के, पुणे – 44.90 टक्के, शिरूर – 43.89 टक्के, अहमदनगर – 53.27 टक्के, शिर्डी – 52.27 टक्के आणि बीड लोकसभा मतदारसंघात सरासरी 58.21 टक्के मतदान झाले आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 46.03 टक्के, पुणे मतदारसंघात 44.90 टक्के आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात 43.89 टक्के इतके मतदान झाले आहे. तत्पूर्वी, पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या 7 मे रोजी मतदान पार पडले. बारामतीत देखील यंदा कमी मतदान झाले आहे. या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सरासरी 56.07 टक्के इतके मतदान झाले होते.