लोकसभा निवडणूक: देशात आज दुसऱ्या टप्प्यात मतदान सुरू, राज्यात 8 जागांवर मतदान

अमरावती, 26 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 88 जागांवर आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. यामध्ये आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांतील मतदारसंघांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यात 8 जागांवर मतदान पार पडत आहे.

या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

दुसऱ्या टप्प्यातील मतदानात अनेक बड्या नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. वायनाड मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी, तिरुवनंतपुरम मधून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, कर्नाटकातून भाजप नेते तेजस्वी सूर्या, मथुरेतून हेमा मालिनी, मेरठ मधून अरुण गोविल, तिरुवनंतपुरम मधून शशी थरूर यांसारख्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यात या जागांवर मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांत आज मतदान होत आहे. यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. अमरावती मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे आणि प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बूब हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच अकोला मतदारसंघाची देखील जास्त चर्चा आहे. अकोला मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांच्यात लढत होत आहे. तसेच परभणी लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जानकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय जाधव निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. राज्यात यंदा पाच टप्प्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदानाच्या दिवशी शाळा, महाविद्यालये, सर्व कार्यालये यांना सुट्टी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. तर दुसऱ्या टप्प्यात आज मतदान पार पडत आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *