आंबेगाव, 28 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. या प्रचार दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी पुरंदर-हवेली मधील विविध सोसायट्यांना भेटी दिल्या. तसेच त्यांनी यावेळी पुरंदर-हवेली मधील आंबेगाव येथील लेक व्हिस्टा सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी लेक व्हिस्टा सोसायटीतील पद्मिनी वीरांगना क्रिकेट क्लबच्या महिला क्रिकेटपटूंची देखील भेट घेतली.
https://twitter.com/ani_digital/status/1784500500785717758?s=19
https://twitter.com/SunetraA_Pawar/status/1784486028604313656?s=19
सुनेत्रा पवारांनी केली बॅटिंग
दरम्यान, आज रविवार असल्यामुळे पद्मिनी वीरांगना क्रिकेट क्लबची प्रॅक्टिस सुरू होती. त्यावेळी उपस्थित महिला क्रिकेटपटूंच्या आग्रहाखातर सुनेत्रा पवार यांनी क्रिकेटच्या मैदानावर जाऊन बॅटिंग केली. याप्रसंगी क्रिकेट टीमच्या सदस्या कल्याणी रॉय, जान्हवी मुंदडा, जयश्री कुंभार, गीता पूजारी, हर्षला गाडे, सलोनी मामिल, प्रिया पाटील, प्राची मांढरे, वेदिका जाधव, मोनिका सिंग यांच्यासह स्थानिक नागरिक आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बारामतीत अटीतटीचा सामना
बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याशी होणार आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार केला जात आहे. त्यामुळे बारामतीत यंदाची लोकसभा निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.