लोकसभा निवडणूक; शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क!

बारामती, 07 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली आहे. राज्यातील 11 मतदान केंद्रावर आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील मतदान केंद्रात मतदान केले. शरद पवारांनी बारामती येथील माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे होत्या. दरम्यान, शरद पवार हे याआधी मुंबईत मतदान करत होते. मात्र, यावेळी बारामती मतदारसंघात पवार कुटुंबीय आमने-सामने आले आहे. ही निवडणूक दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांनी आपल्या लेकीसाठी माळेगावमध्ये मतदान केले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

सुप्रिया सुळेंनी केले मतदान

बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील आज बारामतीत सर्व कुटुंबासमवेत आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पती सदानंद सुळे, मुलगी रेवती सुळे, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या आई प्रतिभाताई पवार यांच्यासह इतर पवार कुटुंबीय उपस्थित होते. मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “सशक्त लोकशाहीत संविधान केंद्रस्थानी ठेवले पाहिजे आणि तिसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. हे मतदान शांततेत पार पडावे ही आमची मागणी आहे.,” अशा त्या यावेळी म्हणाल्या.

रोहित पवारांनी कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला

तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील आज बारामती मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. रोहित पवारांनी बारामतीच्या पिंपळी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे आई वडील, त्यांच्या पत्नी आणि त्यांची ताई हे सर्वजण उपस्थित होते. त्यांनी देखील यावेळी पिंपळी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे फोटो रोहित पवारांनी सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *