लोकसभा निवडणूक; पंतप्रधान मोदींची विजयाच्या ‘हॅटट्रिक’ कडे वाटचाल!

मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. देशातील सर्वात चर्चेत असणाऱ्या वाराणसी येथील लोकसभा जागेसाठी मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली. वाराणसीत भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेवर मतमोजणीच्या कलामध्ये नरेंद्र मोदी हे सध्या 1 लाख 239 मतांनी आघाडीवर आहेत. तर वाराणसीत काँग्रेस उमेदवार अजय राय हे पिछाडीवर आहेत. ही आकडेवारी दुपारी सव्वा एक वाजेपर्यंतची आहे.

लाखांच्या फरकाने आघाडीवर

त्यापूर्वी, मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आघाडी घेतली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी हे पिछाडीवर आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी काँग्रेस उमेदवार अजय राय यांनी 6 हजार 223 मतांनी आघाडी घेतली होती. परंतु, त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये मोदींनी प्रचंड आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे. सध्या याठिकाणी नरेंद्र मोदी लाखांच्या फरकाने आघाडीवर आहेत. तर या मतमोजणीच्या आणखी काही फेऱ्या अजुन व्हायच्या बाकी आहेत.
दरम्यान , पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. मोदींनी 2014 मध्ये सर्वप्रथम वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढविली. तेंव्हा मोदींच्या विरोधात आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे निवडणुकीत अजय राय हे निवडणूक लढवत होते. यामध्ये मोदींनी 3 लाख 71 हजार 784 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील नरेंद्र मोदी यांनी 4 लाख 79 हजार 505 मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव दुसऱ्या स्थानावर राहिल्या. तर अजय राय हे तिसऱ्या स्थानावर राहिले.

मोदींचा विजय निश्चित मानला जातोय

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय विश्लेषकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातून विजय निश्चित मानला जात आहे. नरेंद्र मोदी हे सध्या 1 लाख 239 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र यावेळी त्यांच्या विजयाचा फरक किती असेल? हे पाहणे बाकी आहे. त्याची उत्सुकता भाजपसह सर्व राजकीय पक्षांना लागली आहे. मतमोजणीच्या आणखी काही फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी किती मताधिक्याने विजयाची हॅटट्रिक साधणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *