नाशिक, 01 मे: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. त्यानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना पक्षाने आज हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली आहे. हेमंत गोडसे हे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपासून नाशिक मतदारसंघातील खासदार आहेत. या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांचा सामना महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे. त्यामुळे हेमंत गोडसे सलग तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकतात का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश गणपत म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे.
https://twitter.com/Shivsenaofc/status/1785570379802763629?s=19
https://twitter.com/Shivsenaofc/status/1785530578277966062?s=19
नाशिकच्या जागेचा तिढा सुटला
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीतील नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा आणि बैठका झाल्या. नाशिकच्या जागेवर लढण्यासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी पक्षात वाद चालू होता. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली होती. त्यानंतर आज अखेर महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली.
नाशिकमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. नाशिकमध्ये आता महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे विरुद्ध महायुतीचे हेमंत गोडसे अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर, हेमंत गोडसे हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक साधणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.