लोकसभा निवडणूक; नरेंद्र मोदी यांचा वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल

वाराणसी, 14 मे: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान मोदी आज वाराणसी येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करत असताना त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. मोदींनी यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये वाराणसीमधून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. यंदा वाराणसीत 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1790269697143062846?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1790279020162294092?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1790289659299274911?s=19

अनेक मंत्री आणि नेत्यांची उपस्थिती

तसेच याप्रसंगी गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, अभिनेता पवन कल्याण, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे संपूर्ण वाराणसी शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कानाकोपऱ्यात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

https://twitter.com/AHindinews/status/1790263478336549094?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1790235805467959601?s=19

मोदींनी काल भैरव मंदिरात पूजा केली

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे आज सकाळी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर पोहोचले. याठिकाणी पंतप्रधान मोदींनी गंगापूजन केले. यानंतर नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील काल भैरव मंदिरात पूजा करून आशीर्वाद घेतला. तेथून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. उमेदवारी अर्ज दाखल करताना पंतप्रधान मोदी यांना समर्थन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासह 20 केंद्रीय मंत्री उपस्थित होते. याशिवाय 12 राज्यांचे मुख्यमंत्री देखील यावेळी हजर होते.

https://twitter.com/AHindinews/status/1790281055230136437?s=19

एकनाथ शिंदे यांची हजेरी 

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज एक ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली. आज तुम्ही पाहत आहात की, लोकांमध्ये निवडणुकीची उत्सुकता इतकी वाढली आहे की, मतदान केव्हा करावे? पंतप्रधान मोदींना मत द्यावे, असे लोकांना वाटत असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळे 2014 आणि 2019 चे सर्व रेकॉर्ड मोडून हा आकडा 400 च्या पुढे जाईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *