लोकसभा निवडणूक; पुणे जिल्ह्यातील 4 मतदारसंघाची मतमोजणी 3 ठिकाणी होणार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

पुणे, 31 मे: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. यावेळी पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात देखील मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिक माहिती दिली. बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी तीन ठिकाणी होणार असल्याची माहिती सुहास दिवसे यांनी यावेळी दिली.

https://twitter.com/ANI/status/1796532075660779555?s=19

याठिकाणी मतमोजणी होणार

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एफसीआय गोडावून कोरेगांव पार्क याठिकाणी होणार आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या स्टेट वेअरहाऊस, गोदाम क्र, ब्लॉक पी-39 याठिकाणी होणार आहे. तर मावळ लोकसभा मतदार संघाची मजमोजणी पुण्यातील बालेवाडी स्टेडीयम येथे पार पडणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व तयारी सुरू आहे. स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी आणि सर्व आवश्यक पायाभूत सुविधा तयार केल्या गेल्या आहेत. आम्ही उमेदवारांसोबत दोन बैठका घेतल्या आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.

सुरक्षा व्यवस्थेची माहिती

या दिवशी सर्व मतमोजणी केंद्रांवर तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था असणार आहे. यामध्ये आतील स्तराची जबाबदारी सीएपीएफचे कर्मचारी सांभाळणार आहेत. तसेच दुसऱ्या स्तरावर सीएपीएफ जवान आणि तिसऱ्या स्तरावर राज्य पोलीस अधिकारी कार्यरत असणार आहेत. मतमोजणी हॉलमध्ये फक्त निवडणूक आयोगाने नेमलेले अधिकृत व्यक्तीच मोबाईल घेऊन जाऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/Info_Pune/status/1793238386922156512?s=19

100 मीटर परिसरात जाण्यास बंदी

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या वातावरणात पार पडावी यासाठी 4 जून रोजी मतमोजणी संपेपर्यंत जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रात व त्याच्या 100 मीटर परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रात आणि 100 मीटर परिसरात मतमोजणी वेळी मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, मॅचबॉक्स, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जवळ बाळगल्यास सक्त मनाई आहे. याशिवाय, सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीने जवळ कसल्याही प्रकारची शस्त्रे बाळगली तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *