मुंबई, 24 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावणार आहेत. देशात दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. यावेळी देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभेच्या 89 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये केरळमधील 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 7, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड 3, त्रिपुरा, मणिपूर आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका जागांचा समावेश आहे.
राज्यात 8 जागांवर मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी याठिकाणी प्रचार करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर, आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज या मतदारसंघात राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1782805014958018954?s=19
https://twitter.com/INCMaharashtra/status/1782803191887020118?s=19
https://twitter.com/navneetravirana/status/1782801592800215128?s=19
अमित शाह आणि राहुल गांधींच्या सभा
दुसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी शेवटचा दिवस असल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज अमरावती लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजता जाहीर सभा पार पडणार आहे. अमरावतीत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी सभा होणार आहे. ही सभा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील भारत जोडो यात्रा मैदानात होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडणार आहे. ही सभा सोलापूरच्या मरी आई चौकातील एक्झिबिशन मैदानात दुपारी 3 वाजता पार पडणार आहे. दरम्यान , सोलापूर मतदारसंघात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत जाहीर सभा पार पडणार आहे. अमरावती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह हे आज अमरावतीमध्ये सभा घेणार आहेत. अमरावती येथील सायन्सकोर मैदानात आज सकाळी 11 वाजता त्यांची ही सभा पार पडणार आहे.