लोकसभा निवडणूक; शिरूरमधून अमोल कोल्हे प्रचंड मताधिक्याने विजयी

शिरूर, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी 1 लाख 40 हजार 951 मतांनी विजय मिळवला आहे. अमोल कोल्हे यांचा शिरूरमधील हा सलग दुसरा विजय आहे. या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांचे शिरूरमधील कार्यकर्ते सध्या मोठा जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत.

https://twitter.com/NCPspeaks/status/1798015631750799818?s=19



या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना एकूण 6 लाख 98 हजार 692 इतके मतदान झाले. यामध्ये अमोल कोल्हे यांना मिळालेल्या मतदानाची टक्केवारी 50.83 टक्के इतकी होती. तर दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील यांना एकूण 5 लाख 57 हजार 741 इतकी मते पडली. यामध्ये आढळराव पाटलांच्या मतदानाची टक्केवारी 40.58 टक्के होती. याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघात 9 हजार 661 मतदारांनी नोटाला मतदान केले. याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश 

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली. शिरूरच्या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अमोल कोल्हे यांच्या इतका तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार अजित पवारांकडे नव्हता. तर दुसरीकडे शिरूरच्या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेत असलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे इच्छुक होते. त्यामुळे आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली.

शिरूरमध्ये दोन्ही पवार आमने सामने

शिरूरमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पवार आमने सामने आले होते. त्यामुळे दोन्ही पवारांनी शिरूरची ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून रात्रंदिवस जोरदार प्रचार करण्यात आला. अखेर आज या निवडणुकीची मतमोजणी झाली. यामध्ये शिरूरच्या जनतेने पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना निवडून दिले. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *