भिगवण, 03 मे: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या बारामती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे जाहीर सभा पार पडली. ही भावकी आणि गावकीची निवडणूक नसून, ती देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे कट्टर विरोधक समजले जाणारे नेते एकत्रित प्रचार करताना दिसत आहेत. या संदर्भातील चर्चांवर अजित पवारांनी त्यांच्या भाषणात प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना विकासाचे काम करायचे आहे. ज्यांना आपल्या परिसरात कायापालट व्हावा असे वाटते, असे लोक एकत्र आले आहेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1786273559381434426?s=19
स्थानिक प्रश्न मार्गी लावू
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर भिगवण येथील बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आवश्यक तितक्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच पाण्याचा प्रश्न देखील सोडविण्यात येईल. त्यासाठी केंद्राचा निधी येणे महत्त्वाचे आहे. या कामाकरिता महायुतीच्या खासदाराला मतदान करावे, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले. सोबतच अजित पवार यांनी यावेळी विविध स्थानिक प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. त्यांच्या या सभेला हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, अंकिता पाटील यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवारांच्या आज 4 ठिकाणी सभा
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांच्या काल इंदापूर तालुक्यातील सणसर, शेळगाव आणि निमगाव या तीन ठिकाणी सभा पार पडल्या. तसेच अजित पवार यांच्या आज इंदापूर तालुक्यातील भिगवण, पळसदेव, काटी आणि बावडा याठिकाणी जाहीर सभा पार पडणार आहेत.