बारामती, 22 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 361 उमेदवारांचे 495 अर्ज दाखल झाले होते. या उमेदवारांच्या अर्जांची नुकतीच छाननी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 427 अर्ज वैध ठरले आहेत. तर 68 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. बारामती मतदारसंघात उमेदवारांनी 66 अर्ज दाखल केले होते. यामध्ये 11 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
कोणत्या मतदारसंघात किती अर्ज वैध?
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जाच्या छाननीत रायगड मतदार संघात 40 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यातील 13 अर्ज बाद झाले तर 27 अर्ज वैध ठरले आहेत. बारामतीत 66 अर्ज दाखल करण्यात आले होते. यामधील 10 अर्ज बाद, तर 56 अर्ज वैध ठरले आहेत. उस्मानाबाद मध्ये 50 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील 2 अर्ज बाद, तर 48 अर्ज वैध ठरले आहेत. लातूरमध्ये 50 अर्ज दाखल केले होते. त्यामधील 5 अर्ज बाद, तर 45 अर्ज वैध ठरले आहेत. सोलापूरात 52 अर्ज आले होते. त्यातील 8 अर्ज बाद तर 44 अर्ज वैध ठरले आहेत. माढा येथे 55 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील 8 अर्ज बाद, तर 47 अर्ज वैध ठरले आहेत. सांगलीत 39 अर्ज आले होते. त्यातील 11 अर्ज बाद, तर 28 अर्ज वैध ठरले आहेत. साताऱ्यात 33 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामधील 3 अर्ज बाद, तर 29 अर्ज वैध ठरले आणि एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये 13 पैकी 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. कोल्हापुरात 42 पैकी 3 अर्ज बाद तर 39 अर्ज वैध ठरले आहेत. तसेच हातकणंगले मतदारसंघात 55 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील 5 अर्ज बाद, तर 50 अर्ज वैध ठरले आहेत. ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अजित पवारांचा अर्ज बाद
तत्पूर्वी, सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतःचा डमी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज काही कारणास्तव बाद झाला तर, खबरदारी म्हणून अजित पवार यांनी डमी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, अर्जाच्या छाननीत अजित पवारांचाच अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, अजित पवार यांचा अर्ज बाद झाला नसता तरीही अजित पवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागेच घेतला असता.
आज अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज (दि.22) सायंकाळी संपणार आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात कशी लढत होणार? याचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे.