लोकसभा निवडणूक: सातव्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये देशात 61.63 टक्के मतदान

दिल्ली, 02 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 57 जागांसाठी शनिवारी सायंकाळी मतदान समाप्त झाले. या मतदानाची अंतिम आकडेवारी आता समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सरासरी 61.63 टक्के मतदान झाल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. तर यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक सरासरी 73.36 टक्के मतदान झाले आहे. तसेच बिहारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरी 51.92 टक्के मतदान झाले आहे.

कोणत्या राज्यात किती मतदान?

सातव्या टप्प्यात देशातील 7 राज्यात काल मतदान पार पडले. यामध्ये पंजाबमध्ये सरासरी 58.33 टक्के, हिमाचल प्रदेशात 69.67 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 73.36, बिहारमध्ये 51.92 टक्के, उत्तर प्रदेशात 55.59 टक्के, ओडिशा येथे 70.67 टक्के, झारखंडमध्ये 70.66 टक्के, चंदीगडमध्ये सरासरी 67.09 टक्के इतके मतदान झाले आहे.

हे दिग्गज होते रिंगणात

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हमीरपूरमधून, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून, लालूप्रसाद यांची कन्या मीसा भारती पाटलीपुत्र मधून आणि अभिनेत्री कंगना राणौत मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सातव्या टप्प्यात वाराणसी मधून निवडणूक लढवली आहे. देशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. आता सर्वांना 4 जूनची प्रतीक्षा आहे. कारण, 4 जून रोजी लोकसभेच्या सर्व जागांचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत देशाच्या जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *