बारामती, 23 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया काल पूर्ण झाली. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यंदाच्या लोकसभेला बारामती मतदारसंघात 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळेस सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयींमध्ये प्रमुख लढत असणार आहे.
बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत
बारामती मतदारसंघ हा प्रामुख्याने पवारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र, यावेळेस याठिकाणी वेगळे चित्र आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातील फुटीमुळे प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. बारामती मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.
इतर पक्षांतील उमेदवारांची नावे
यांच्या व्यतिरिक्त बारामती लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार प्रियदर्शनी नंदकुमार कोकरे या हत्ती या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) पक्षाच्या उमेदवार त्रिशला कांबळे या गॅस सिलेंडर या चिन्हावर, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे दशरथ नाना राऊत हे अंगठी चिन्हावर, तर भारतीय नवजवान सेना पक्षाचे उमेदवार महादेव साहेबराव खेंगरे-पाटील यांचे चिन्ह ऊस शेतकरी हे असणार आहे. बारामती मतदारसंघांत पिपल्स यूनियन पार्टीचे उमेदवार राजेंद्र पांडुरंग भोसले यांचे चिन्ह शिट्टी असे आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार रोहिदास बाळासो कोंडके यांचे चिन्ह नाग आहे. दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दलाचे उमेदवार लक्ष्मण राम कुंभार हे हॉर्मोनियम या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार शिवाजी रामभाऊ नांदखिले यांचे चिन्ह भेटवस्तू असणार आहे. भीम सेनेचे उमेदवार श्रीधर नारायण साळवे यांचे चिन्ह ऑटो रिक्शा आहे. तसेच हिंदूस्तान जनता पार्टीच्या उमेदवार सविता भिमराव कडाळे यांचे चिन्ह खाट असणार आहे.
अपक्ष उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा बहुतांश उमेदवार हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यामध्ये उमेश महादेव म्हेत्रे यांचे चिन्ह स्टूल, अंकुश ज्ञानेश्वर पिलाणे यांचे चिन्ह कढई, कल्याणी सुजीतकुमार वाघमोडे यांचे चिन्ह शिवण यंत्र, गजानन उत्तम गवळी (पाटील) यांचे चिन्ह बासरी, दत्तात्रय रामभाऊ चांदारे यांचे चिन्ह कपाट, प्रा. नामदेवराव जाधव यांचे चिन्ह दूरध्वनी, प्रदीप रामचंद्र माने यांचे चिन्ह टेबल, बापू प्रल्हाद पवार यांचे चिन्ह गॅस शेगडी, बाळासो मारूती धापटे यांचे चिन्ह रूम कुलर, मनोज बाळासाहेब रसाळ यांचे चिन्ह दुर्बिण, महेश सिताराम भागवत यांचे चिन्ह ट्रक, मिलींद विठ्ठल शिंदे यांचे चिन्ह बॅटरी टॉर्च, राजेंद्र महादेव बरकडे यांचे चिन्ह स्पॅनर, विजय लक्ष्मण गव्हाळे यांचे चिन्ह इस्त्री, विजयप्रकाश अनंत कोंडेकर यांचे चिन्ह बूट, विशाल अरूण पवार यांचे चिन्ह किटली, शरद राम पवार यांचे चिन्ह जेवणाचे ताट, शिवाजी जयसिंग कोकरे यांचे चिन्ह सितार, शुभांगी धायगुडे यांचे चिन्ह बॅट, शेख सोयलशहा युनुसशहा यांचे चिन्ह तुतारी, शैलेंद्र उर्फ संदीप करंजावणे यांचे चिन्ह सीसीटीव्ही कॅमेरा, सचिन शंकर आगवणे यांचे चिन्ह ग्रामोफोन, सुनिता पवार यांचे चिन्ह जातं, सुरेशदादा बाबुराव वीर यांचे चिन्ह रोड रोलर, डॉ. सोमनाथ उर्फ बाळासाहेब अर्जुन पोळ यांचे चिन्ह प्रेशर कुकर आणि संदिप आबाजी देवकाते यांचे चिन्ह मोत्यांचा हार आहे. हे सर्व उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत.