लोकसभा निवडणूक 2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात

बारामती, 12 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून (दि.12) सुरूवात होणार आहे. देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 94 लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात निवडणुकीसाठी उमदेवारीचा अर्ज भरण्यासाठी 19 एप्रिल ही शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे उमेदवारांना हे अर्ज 19 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करता येणार आहेत.

https://twitter.com/CEO_Maharashtra/status/1778621233220956471?s=19

तिसऱ्या टप्प्यात या मतदार संघात निवडणूक

तिसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली, दीव आणि दमण या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदार संघात मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातील रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

https://twitter.com/CEO_Maharashtra/status/1769005703723917571?s=19

राज्यात 5 टप्प्यात मतदान होणार

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आजपासून अधिसूचना जारी केली आहे. यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशातील एकूण 543 मतदारसंघांमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. देशात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात होणार आहे. तर महाराष्ट्रात 48 जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *