मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारासंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर 82 हजार 784 मतांनी विजय मिळवला. या विजयामुळे सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे.
https://twitter.com/mahancpspeaks/status/1797958679448424877?s=19
कोणाला किती मतदान?
या निवडणुकीत सुनील तटकरे यांना 5 लाख 05 हजार 529 मते मिळाली. तसेच यावेळी तटकरे यांना 1 हजार 823 पोस्टल मते मिळाली. या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत 50.17 टक्के मते मिळाली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांना 4 लाख 23 हजार 137 मते मिळाली आहेत. सोबतच त्यांना 2 हजार 431 पोस्टल मते मिळाली. तर या निवडणुकीत वसंत गीते यांच्या बाजूने अन्य उमेदवारांच्या तुलनेत 42 टक्के मतदान झाले. तर दुसरीकडे मात्र, रायगड लोकसभा मतदारसंघात तब्बल 27 हजार 188 लोकांनी नोटाला मतदान केल्याचे निदर्शनास आले आहे. याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
https://twitter.com/SunilTatkare/status/1797968799012135098?s=19
तटकरे यांनी मानले जनतेचे आभार
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सुनील तटकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. “आपले बहुमूल्य मत देऊन मला विजयी करणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू-भगिनींचा ऋणी आहे. हे मत आपण विकासाला दिलेले आहे, प्रगतीच्या नव्या वाटेला दिलेले आहे. आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच आपल्या सेवेत तत्पर राहिन, असा शब्द देतो. आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे सोबत वाटचाल करायची आहे. हा सत्याचा विजय आहे, हा विकासाचा विजय आहे, हा आपल्या सर्वांचा विजय आहे! या उमेदवारीसाठी माझ्यावर विश्वास दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सर्वच मित्रपक्षांचे नेते यांचा मी आभारी आहे. हा विजय शक्य करण्यासाठी दिवसरात्र झटलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, रिपाई, रासप व मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांचाही मी मनःपूर्वक आभारी आहे. असे सुनील तटकरे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीने एक जागा जिंकली
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपात मोठी रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळाले होते. बऱ्याच दिवसानंतर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला. या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत भाजपला सर्वाधिक 28 जागा मिळाल्या. तसेच यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला 4 जागा आणि रासपला 1 जागा मिळाली. मात्र, या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळत नसल्याचे या निकालावरून दिसून येत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला 4 पैकी केवळ एकच जागा जिंकता आली आहे.