लोकसभा निवडणूक निकाल; नरेंद्र मोदींनी वाराणसीतून विजयाची हॅटट्रिक साधली

वाराणसी, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेस उमेदवार अजय राय यांचा 1 लाख 52 हजार 513 मतांनी पराभव केला. परंतु, 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नरेंद्र मोदींनी यंदा कमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. तसेच यावेळी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांना कमी मते मिळाली.

https://twitter.com/ANI/status/1797957334985023651?s=19

नरेंद्र मोदींना इतके मतदान झाले

2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदारसंघातून 6 लाख 11 हजार 439 इतकी मते पडली आहेत. तसेच त्यांना 1 हजार 531 पोस्टल मते मिळाली. नरेंद्र मोदींना या निवडणुकीत 54.24 टक्के मतदान झाले. तर दुसरीकडे, अजय राय यांना 4 लाख 59 हजार 084 मते मिळाली. या निवडणुकीत त्यांना 1 हजार 373 इतकी पोस्टल मते मिळाली. तर अन्य उमेदवारांच्या तुलनेत अजय राय यांना 40.74 टक्के मते मिळाली. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमध्ये 8 हजार 463 लोकांनी नोटाचे बटण दाबले. या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

मोदींचा सलग तिसरा विजय

दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम वाराणसी मधून निवडणूक लढवली. त्यावेळी मोदींना 5 लाख 81 हजार 022 मते मिळाली होती. या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल मोदींच्या विरोधात उभे राहिले होते. तेंव्हा अरविंद केजरीवाल यांना नरेंद्र मोदी यांच्या नंतर 2 लाख 09 हजार 238 मते मिळाली होती. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांना 6 लाख 74 हजार 664 इतकी प्रचंड प्रमाणात मते मिळाली होती. त्यावेळी वाराणसीतून समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव या दुसऱ्या स्थानावर राहिल्या होत्या. शालिनी यादव यांना 1 लाख 95 हजार 159 मते मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *