लोकसभा निवडणूक मतमोजणी: राहुल गांधी दोन्ही जागांवर प्रचंड मताधिक्याने आघाडीवर

वायनाड, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी सध्या पार पडत आहे. या मतमोजणीच्या आणखी काही फेऱ्या अजुन बाकी आहेत. या मतमोजणीचे कल येत आहेत. त्यानुसार, लोकसभेच्या 543 जागांपैकी सध्या एनडीए 298 जागांवर आघाडीवर आहेत. तर इंडिया आघाडी सध्या 225 जागांवर आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती सध्या 18 जागांवर आहे. यामध्ये काँग्रेस 12 जागा, भाजप 11 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 11 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरचंद्र पवार पक्ष 8 जागा, शिवसेना 6 जागा, राष्ट्रवादी 1 जागा आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे. ही आकडेवारी दुपारी पावणे दोन वाजेपर्यंतची आहे.

राहुल गांधींना लाखांच्या घरात लीड

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधी हे सध्या खुप जास्त फरकाने आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून 3 लाख 28 हजार 460 मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात राहुल गांधींचा सामना भाजप नेते के सुरेंद्रन यांच्याशी होत आहे. तर राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सध्या 2 लाख 75 हजार 465 मतांनी आघाडीवर आहेत. यामध्ये राहुल गांधींचा सामना भाजपचे दिनेश सिंह यांच्याशी होत आहे. तर ही आकडेवारी दुपारी सव्वादोन वाजेपर्यंतची आहे.

गेल्या निवडणुकीत ही 2 जागांवर उभा

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये यूपीमधील अमेठी आणि केरळमधील वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांचा भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघात 4 लाख 31 हजार 770 मतांनी विजय मिळवला होता. वायनाड मध्ये त्यांनी भाकपा उमेदवार पीपी सुनीर यांचा पराभव केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *