मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) देशातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात 48 जागांवर मतदान झाले. या मतमोजणीचे सुरूवातीचे कल हाती आले आहेत. या कलानुसार, महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी 29 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती 18 जागांवर आघाडीवर आहेत. यामध्ये भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 10 जागा, काँग्रेस 11 जागा, शिवसेना 6 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष 8 जागा, राष्ट्रवादी 1 जागा आणि इतर पक्ष 1 जागांवर आघाडीवर आहे.
सुप्रिया सुळे आघाडीवर
सुरूवातीच्या कलामध्ये बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या जवळपास 08 हजार 048 मतांनी आघाडीवर आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. मावळमध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे हे जवळपास 29 हजार 044 मतांनी आघाडीवर आहेत. मावळमध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात चुरस आहे. पुणे लोकसभा मतदार संघात सध्या भाजपचे मुरलीधर मोहोळ 11 हजार 968 मतांनी आघाडीवर आहेत. तर पुण्यातून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत. तर पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे हे 11 हजार 218 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवर आहेत. ही आकडेवारी सकाळी 11 वाजेपर्यंतची आहे. तर मतमोजणीच्या काही फेऱ्या अजुन बाकी आहेत. या सर्व फेऱ्या पुर्ण झाल्यानंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
नवनीत राणा पिछाडीवर
तर राज्यातील चर्चेत असलेल्या मतदारसंघातील सुरूवातीच्या कलानुसार, अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा या पिछाडीवर आहेत. अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे 10 हजार 063 मतांनी आघाडीवर आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले हे पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे हे 14 हजार 537 मतांनी आघाडीवर आहेत. बीडमध्ये सध्या भाजपच्या पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे 2 हजार 444 मतांनी आघाडीवर आहेत. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे 23 हजार 594 मतांनी पिछाडीवर आहेत. जालन्यातून भाजपचे रावसाहेब दानवे हे पिछाडीवर आहेत. जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे 3 हजार 283 मतांनी आघाडीवर आहेत.
सुनील तटकरे आघाडीवर
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत. याठिकाणी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या 38 हजार 830 मतांनी आघाडीवर आहेत. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे उज्वल निकम हे 34 हजार 974 मतांनी आघाडीवर आहेत. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे 18 हजार 238 मतांनी आघाडीवर आहेत. याठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते हे पिछाडीवर आहेत. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे 23 हजार 535 मतांनी आघाडीवर आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे 9 हजार 969 मतांनी आघाडीवर आहेत. येथे भाजपचे रणजितसिंह निंबाळकर पिछाडीवर आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे हे 62 हजार 003 मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज हे 30 हजार 398 मतांनी आघाडीवर आहेत. ही आकडेवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतची आहे. ही मतमोजणी अद्याप सुरू आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर या सर्व जागांचे निकाल जाहीर होणार आहेत.