बारामती, 26 जुलैः बारामती शहरातील कसबामधील साठेनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. गेल्या अनेक दशकांपासून साठेनगर परिसरचा विकासाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तेथील स्थानिकांकडून होत आहे. निवडणुका आल्या की फक्त मतांसाठी साठेनगरमधील स्थानिकांचा वापर करण्यात येतो, असेही स्थानिकांकडून आरोप होत आहे.
दरम्यान, साठेनगरमधील जुन्या समाज मंदिर पाडले गेले होते. नवीन समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गेल्या पंचवार्षिक निवडणुकीआधी करण्यात आले. मात्र निवडणूक झाल्यानंतर तब्बल 35 लाख रुपयांचे वर्क ऑर्डर असलेले बांधकाम बंद पडले आहे.
बारामती शहराचा एकीकडे वेगाने विकास होत आहे, तर दुसरीकडे अनुसूचित जाती जमातींच्या वस्तींकडे जाणूनबुजून दुर्लक्षित होताना दिसत आहे. साठेनगरमधील सार्वजनिक शौचालयाची अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. यामुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच साठेनगरमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असून गटार तुंबलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पुढारी आणि पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात साठेनगरमधील स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या 4 ऑगस्ट 2022 रोजी बारामती नगर परिषदसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन 22 जुलै रोजी बानपचे मुख्याधिकारी मुकेश रोकडे यांना दिले. यावेळी सुजय रंदिवे, दत्ता खरात, आकाश खुडे, अजय खरात, विनायक पाटोळे, सोमनाथ पाटोळे, उत्तम खरात आदी उपस्थित होते.