दिल्ली, 05 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (दि.04) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सुनावणी झाली. मात्र, ही सुनावणी जेवणाच्या सुट्टीच्या आधी झाल्याने ती काही मिनिटांतच आटोपली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन.के. सिंह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. परंतु , त्यावेळी या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांना आपली बाजू नीट मांडता आली नाही. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. तसेच न्यायालयाने सुनावणीची तारीखही जाहीर केली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
https://x.com/LiveLawIndia/status/1896788852511244799?t=HR8pXeDSG0VhQTcK5C7ljA&s=19
कोर्टात काय झाले?
या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारचे वकील तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे दोन दिवसांचा वेळ मागितला. यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विरोध केला. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही पक्षांना विचारणा केली की, नेमके काय प्रकरण आहे? मात्र, दोन्ही बाजूंमध्ये गोंधळ उडाल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली. यामुळे सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढील सुनावणीची तारीख स्पष्ट केलेली नाही. तसेच, कोर्टाने याचिकाकर्त्यांना सूचना दिल्या की, ते आपली बाजू योग्य प्रकारे मांडत नाहीत. दरम्यान, ही सुनावणी पुढे ढकलल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे या निवडणुका कधी होणार? हा देखील मोठा प्रश्न आहे.
निवडणुका कधी होणार?
राज्यात गेल्या काही वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक यांसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. तसेच, अनेक नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. सध्या या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांकडून चालवला जात आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यामुळे या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.