रायगडाप्रमाणेच शिवनेरीचा देखील विकास करणार, मुख्यमंत्री एकनाथ यांची ग्वाही

शिवनेरी, 19 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) शिवनेरी किल्ल्यावर आज ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून, तो जपण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध 20 पर्यटनस्थळे विकसित होत आहेत. यामध्ये किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1759409495724159255?s=19

शिवरायांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केले: मुख्यमंत्री

अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात साजरी होत असते. पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिव छत्रपती म्हणजे युगपुरुष आणि युगप्रवर्तक राजे होते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या हिरडा पिकांना नुकसान भरपाई!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवछत्रपतींचा इतिहास जतन करण्यासाठी शासन कायम कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. किल्ले रायगडाप्रमाणे किल्ले शिवनेरीचा देखील विकास करण्यात येत आहे. या पट्ट्यातील तीर्थक्षेत्र जोडण्याबाबत विचार होईल. असे ते यावेळी म्हणाले. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या हिरडा पिकांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

उद्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी उद्या विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याप्रसंगी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *