कांबळेश्वर येथे महसूली सजा कार्यालय स्थापन करण्याची मागणी, अजित पवारांना पत्र

बारामती, 26 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती तालुक्यातील कांबळेश्वर ग्रामपंचायतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तहसीलदार गणेश शिंदे, आणि उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना सादर केलेल्या पत्राद्वारे सध्या शिरसणे येथे असलेले महसूली सजा कार्यालय कांबळेश्वर येथे स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात कांबळेश्वर गावच्या सरपंच मंदाकिनी कानडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन वाघमारे, सिमा खलाटे, प्रकाश खलाटे आणि किरण आगवणे यांनी अजित पवारांसह सबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.



महसूली सजा अंतर्गत येणाऱ्या गावांची खातेदार संख्या आणि लोकसंख्या पाहता, कांबळेश्वर गावामध्ये 1380 खातेदार असून 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 4000 आहे. त्याचप्रमाणे, पांढरवाडी येथे 444 खातेदार, पिंगळेवस्ती येथे 356 खातेदार आहेत. सध्या सजा कार्यालय असलेल्या शिरसणे गावात फक्त 236 खातेदार असून, गावाची लोकसंख्या 1900 आहे.



त्यामुळे खातेदारांची संख्या, लोकसंख्या आणि होत असलेल्या गैरसोयी लक्षात घेता, कांबळेश्वर येथे मुख्य महसूली सजा कार्यालय स्थापन करणे अधिक सोयीस्कर ठरेल. यामुळे स्थानिकांना महसूली व शासकीय सुविधा सहज आणि जलद उपलब्ध होतील, अशी मागणी सरपंच मंदाकिनी कानडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन वाघमारे, सिमा खलाटे, प्रकाश खलाटे आणि किरण आगवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *