शिंदे आणि फडणवीसांचे शरद पवारांना पत्र; भोजनाला येणे शक्य नसल्याचे सांगितले

मुंबई, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले होते. यासंदर्भातील शरद पवारांचे पत्र व्हायरल झाले होते. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना पत्र लिहून भोजनाला येणे शक्य होणार नसल्याचे सांगितले आहे. उद्या दिवसभर व्यस्त कार्यक्रमांमुळे स्नेहभोजनसाठी येता येणार नाही, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांना पत्र

“आपले 28 फेब्रुवारी 2024 रोजी पत्र मिळाले. आपण आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. परंतु पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी आपल्याकडे इच्छा असुनही यावेळी येऊ शकणार नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तरी भविष्यात नक्कीच आपल्याकडे भोजनाचा योग येईल असे मला वाटते. पुन्हा एकदा निमंत्रणाबद्दल धन्यवाद!!” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रात म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात काय म्हटले?

“आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि त्यानंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही. पुनश्चः एकदा आपले आभार.” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *