महिला पोलिसांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे पत्र खोटे, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

मुंबई, 09 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातील 8 महिला पोलिस शिपायांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे तक्रार करणारे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध विभागाला पाठवण्यात आले होते. तसेच या प्रकरणातील सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही या पत्रातून करण्यात आली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1744327596765216925?s=19



राज्य महिला आयोगाने या पत्राची दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल तात्काळ पाठविण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी चोकशी केली. महिला पोलिसांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारीचे पत्र खोटे असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. तसेच हे पत्र एका अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे व्हायरल केले असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1744365520520950088?s=19



“सदर प्रकरणी आम्ही सखोल माहिती घेतली असता व तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता, सदरचा अर्ज त्यांनी केला नसून त्यांचे नाव सही कोणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे. सदरची माहिती ही पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक सदरचे कृत्य केले असल्याचे समजून आले आहे. सदर अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणती घटना घडलेली नसून खोडसाळपणे अर्ज करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत. आम्ही या संदर्भातील अहवाल आपल्या राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाला सादर करीत आहोत,” असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *