मुंबई, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर नुकताच संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री तसेच भाजप आणि एनडीएचे बडे नेते उपस्थित होते. मात्र, या शपथविधी सोहळ्याकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. त्यावरून राजकीय वर्तुळात सध्या उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
विरोधी पक्षांचे प्रमुख नेते अनुपस्थित
दरम्यान, शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडून राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना देखील या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले होते. मात्र, सर्व नेत्यांनी राज्य सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांसारखे विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या शपथविधी सोहळ्यात दिसले नाहीत. त्यामुळे हे नेते शपथविधी सोहळ्याला का उपस्थित राहिले नाहीत? असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. तसेच विरोधी पक्षांतील हे बडे नेते या सोहळ्यात दिसले नाहीत त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
तत्पूर्वी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला. या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत 230 जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीला केवळ 48 जागा जिंकता आल्या. दरम्यान हा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी यावेळी ईव्हीएमच्या मतदानावर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आमने सामने आले होते. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहणेच पसंत केले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु, या नेत्यांच्या गैरहजेरीचे खरे कारण समजू शकलेले नाही.