मुंबई, 18 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची शुक्रवारी मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.
https://twitter.com/kharge/status/1791511230194098320?s=19
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीतील पक्षांवर जोरदार निशाणा साधला. या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, त्यांनी आणि पंडित जवाहरलाल नेहरूजींनी आपल्याला हे संविधान दिले. संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार, समानता, स्वातंत्र्य आणि आरक्षण दिले आहे. मात्र या सर्व अधिकारांवर भाजप-आरएसएसचा डोळा आहे. त्यांना आणखी एक संधी देऊन आम्ही हे अधिकार धोक्यात घालणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अलीकडेच 13 मे रोजी घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्या होर्डिंगखाली 40 हून अधिक लोक गाडले गेले. त्याच दिवशी मोदीजी मुंबईत त्याच ठिकाणी रोड शो करतात. एका बाजूला शोक तर दुसरीकडे मोदींचा निवडणूक प्रचार. मोदीजींना या पीडितांच्या जीवापेक्षा त्यांच्या निवडणूक प्रचाराची जास्त काळजी होती, अशा शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
मोदींना देश हुकूमशाहीकडे नेयचाय: केजरीवाल
तसेच यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींना भारतीय लोकशाही नष्ट करायची असून देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोप केला. जर तुम्ही तुमच्या विरोधकांना पराभूत करू शकत नसाल तर त्यांना अटक करा, असे मोदींचे धोरण आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दावा केला की पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राविषयी राग आहे. तसेच नरेंद्र मोदींना मुंबईला गरीब बनवायचे आहे आणि त्यांना सर्व उद्योग आणि व्यवसाय गुजरातमध्ये नोयचे आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1791531763044426217?s=19
ठाकरे – पवार काय म्हणाले?
पंतप्रधान लोकांना पाकिस्तानची भीती दाखवतात, पण चीनबद्दल बोलत नाहीत, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच लोक जेव्हा बेरोजगारी आणि महागाईवर बोलतात तेव्हा मोदी लोकांना मुस्लिमांबद्दलची भीती दाखवतात, असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख केला होता. त्यावरून शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “आम्हा लोकांबद्दल तुम्ही बोललात, की महाराष्ट्रात कोणी भटकती आत्मा आहे. आत्मा हा माणूस गेल्यानंतर असतो. त्यांना चिंता पडली आम्हा लोकांची, पण मी एवढंच सांगतो की हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जे जे करावे लागेल, ते करायची ताकद तुम्हा सगळ्यांच्या मदतीने आमच्याकडे आहे. त्याची पूर्ण उपयुक्तता आमच्याकडून केली जाईल,” असे शरद पवार यावेळी म्हणाले.