नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला ‘या’ देशांतील नेते उपस्थित राहणार

दिल्ली, 08 जून: (विश्वजीत खाटमोडे) नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा 09 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी भारताच्या शेजारील आणि हिंदी महासागर क्षेत्रातील नेत्यांना मान्यवर पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस या देशांतील प्रमुख नेते पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/PIB_India/status/1799349854839435624?s=19

या देशांच्या नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले

यावेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे. याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान, हे सर्व नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासोबतच ते त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीलाही उपस्थित राहतील.

9 जून रोजी शपथविधी

तत्पूर्वी, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीएने लोकसभेच्या 543 जागांपैकी 293 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आहेत. नरेंद्र मोदी हे रविवारी सायंकाळी 7.15 वाजता त्यांच्या मंत्रिमंडळासोबत पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची सध्या राष्ट्रपती भवनात जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे भारतीय नेते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *