जालना, 22 जून: (विश्वजीत खाटमोडे) ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी त्यांचे उपोषण आज मागे घेतले आहे. गेल्या 10 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे त्यांचे उपोषण चालू होते. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा एकदा या उपोषणकर्त्यांची वडीगोद्री येथे जाऊन भेट घेतली. शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर आणि राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाके यांनी हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, हे आंदोलन रद्द झाले नसून, तात्पुरते स्थगित केल्याचे आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.
https://x.com/ChhaganCBhujbal/status/1804482956452675783?s=19
शिष्टमंडळात या नेत्यांचा समावेश
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज वडीगोद्री येथे दाखल झाले. त्यांच्या या शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषिमंत्री धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, अतुल सावे, विकास महात्मे या नेत्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासोबत आज पुन्हा एकदा चर्चा केली. लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले.
दहा दिवसांनी उपोषण मागे
तसेच आमच्या काही मागण्यांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तर काही मागण्यांबाबत निर्णय होणे बाकी आहे, असे लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले. आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, त्यामुळे हे उपोषण आम्ही आज तात्पुरते स्थगित करीत आहोत. राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन सुरू करू, असा इशारा यावेळी लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला दिला. ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, या संदर्भातील सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनांचे पत्र छगन भुजबळ यांनी लक्ष्मण हाके यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते
इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचे लेखी आश्वासन राज्य सरकारने द्यावे. राज्य सरकारने ओबीसी आणि सगेसोयरे संदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट करावी. तसेच राज्यभरात सध्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे, त्याला राज्य सरकारने स्थगिती द्यावी आणि देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे सध्या बेमुदत उपोषणाला बसले होते.