बदलापूर, 23 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस एन्काऊंटर मध्ये ठार झाला आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत. पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामधून शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
https://x.com/PawarSpeaks/status/1838235282199470458?s=19
शरद पवारांचे ट्विट
“बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणे अपेक्षित आहे,” असे शरद पवारांनी यामध्ये म्हटले आहे.
https://x.com/ANI/status/1838239591817715929?s=19
रिमांडसाठी नेले जात असताना घटना घडली
दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याने बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तर आरोपी अक्षय शिंदे याला आज (सोमवारी) तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेले जात होते. त्यावेळी अक्षयने पोलिसांकडे असलेली बंदूक हिसकावून घेतली आणि त्याने या बंदुकीने पोलिसांवरच काही राऊंड गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी देखील स्वसंरक्षणासाठी आरोपी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेत पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.