ई-बसेस प्रकल्पाचे आज लोकार्पण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार

मुंबई, 13 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) एसटी महामंडळाने 5 हजार 150 वातानुकूलित ई-बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. हा कार्यक्रम आज दुपारी 3 वाजता ठाणे येथील खोपट बसस्थानक याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये सुरूवातीला बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गावर या बसेस सुरू करण्यात येणार आहेत. याची माहिती एसटी महामंडळाने एका निवेदनातून दिली आहे.

https://twitter.com/msrtcofficial/status/1757033430712214002?s=19

राज्यात 5150 ई-बसेस धावणार!

या ई-बसेस प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकूलित असणार आहेत. तरी देखील या बसेस किफायतशीर दरामध्ये धावणार आहेत. या प्रकल्पांतर्गत एसटी महामंडळ 5 हजार 150 वातानुकूलित नव्या ई-बसेस घेणार आहे. यासाठी राज्यभरात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जीग स्थानके निर्माण केली जात आहेत. या ई-बसेस 34 आसनी असणार आहेत. ई-बसेस उद्या पासून बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गावर धावणार आहेत. तर याचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी (एशियाड) बसेस सारखाच असणार आहे. विशेष म्हणजे, या बसेस मध्ये महिलांना 50 टक्के, 65 ते 75 वर्षा पर्यतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे.

या ई-बसचे आरक्षण करता येणार

या बसचे आरक्षण www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार आहे. तसेच msrtc mobile reservation App या मोबाईल ॲपवर देखील ह्या ई-बसेसचे आरक्षण उपलब्ध होणार आहेत. तरी या सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *