लातूर, 10 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने आपल्या प्रादेशिक युनिट्सच्या सहकार्याने लातूर जिल्ह्यातील रोहिणा या डोंगराळ गावात असलेल्या गुप्त मेफेड्रोन ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर कडक कारवाई केली. याप्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याची माहिती डीआरआयने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
डीआरआयने दिली माहिती
डीआरआयला बेकायदेशीर मेफेड्रोन ड्रग्स तयार करणाऱ्या टोळीबाबत गुप्त माहिती होती. त्यानुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 8 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावातील दुर्गम डोंगराळ भागात या कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत 11.36 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आले. यात हे 8.44 किलो ड्रग्स सुक्या स्वरूपात आणि 2.92 किलो द्रव स्वरूपात होते. यासोबत मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि प्रयोगशाळेतील साहित्यही सापडले.
पोलीस कॉन्स्टेबल अटकेत
या कारवाईत सुरूवातीला पाच जणांना अटक करण्यात आली. तर पुढील तपासात मुंबईतून आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्यांमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे. तसेच या आरोपींमध्ये आर्थिक पुरवठा करणारा आणि ड्रग्सचा वितरक यांचा समावेश आहे.
डीआरआयची यशस्वी मोहीम
दरम्यान, या सर्व सात आरोपींनी मेफेड्रोनच्या निर्मिती, आर्थिक मदत आणि विक्रीमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली आहे. जप्त केलेल्या मेफेड्रोनची काळ्या बाजारातील किंमत सुमारे 17 कोटी रुपये आहे. ही कारवाई अमली पदार्थ कायदा एनडीपीसी ॲक्ट, 1985 अंतर्गत करण्यात आली आहे. ही कारवाई डीआरआयची एक महत्त्वाची यशस्वी मोहिम ठरली आहे. झाडाझडतीदरम्यान सापडलेल्या उपकरणांवरून हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागात अशा बेकायदेशीर कारवायांचे जाळे वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाकडून ग्रामीण भागात अधिक सतर्कता आणि कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.