पुणे, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमानात आज मोठी घट झाली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्रातील पुण्यासह, मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण या भागांत सकाळी हवेतील गारवा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील काही दिवस थंडीचा आनंद लुटता येणार आहे. तर दुसरीकडे येत्या 2 ते 3 दिवसांत विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अत्यंत हलका पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या काळात उर्वरित राज्यात कोरडे हवामान राहील, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
https://twitter.com/anupamkashyapi/status/1764120581480599981?s=19
या भागांत आहे थंडी
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान बदलले आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागांत गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. अशातच राज्यातील तापमानात आज मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील पुणे, मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यात आज सकाळी 13 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना आज सुखद गारवा अनुभवायला मिळाला.
राज्यातील निवडक शहरांचे तापमान
राज्यातील माथेरानमध्ये आज सकाळी 12 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिक येथे आज 12.4 अंश सेल्सिअस, बारामती 12.9 अंश सेल्सिअस, पुणे 13 अंश सेल्सिअस, जळगांव 13.2 अंश सेल्सिअस, अहमदनगर 13.6 अंश सेल्सिअस, मालेगांव 14.2 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजी नगर 14.2 अंश सेल्सिअस, सातारा 14.6 अंश सेल्सिअस, डहाणू 16.1 अंश सेल्सिअस, जालना 18 अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी मध्ये 19.6 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.