बारामती, 14 मार्च: शासकीय आयुर्वेदिक कॉलेजसाठी म्हाडाकडून भूखंडधारकांना मिळालेली जागा शासनाने बळजबरीने ताब्यात घेतली तसेच पर्यायी जागाही आजवर दिलेली नाही, असा आरोप करत मेडद, बारामती म्हाडा भूखंडधारक कृती समितीकडून बुधवार (दि.12) पासून येथील तीन हत्ती चौकात बेमुदत उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.
मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी जी जागा शासनाने ताब्यात घेतली, ती म्हाडाकडून भूखंडधारकांना कायम खुष खरेदीखत करून मिळालेली होती. त्याला कुठलेही नियम व अटी लावण्यात आल्या नव्हत्या. तसेच वापरासाठी कुठलिही कालमर्यादा ही ठेवण्यात आली नव्हती. प्रत्यक्षात आयुर्वेदिक काॅलेजला शासनाकडून 15 एकर जमीन ताब्यात मिळाली असताना त्या जमिनीच्या लगत असणारी सदर भुखंड धारकांची जागा तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचनेवरून जागा ताब्यात घेताना शासकीय अधिकाऱ्यांकडून अन्यायकारक पद्धत अवलंबण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
केवळ एका दिवसात या जागेच्या सात बारावरील नोंदी बदलण्यात आल्या. खरेदीखत पलटवून घेण्यात आलेले नव्हते, असा आंदोलकांचा आरोप आहे. आयुर्वेदिक कॉलेजची इमारत उभी राहिली, तरी अद्यापही या भूखंडधारकांना मेडद हद्दीत अथवा पाच किलोमीटर परिघामध्ये कुठेही सर्वमान्य अशी पर्यायी जागा अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे मेडद म्हाडा भूखंडधारक कृती समितीकडून बेमुदत उपोषण व ठिय्या आंदोलनाचा मार्ग पत्करल्याचे सांगण्यात आले. यासंबंधी आम्ही उच्च न्यायालयात देखील लढा देत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.